रविवार, 7 सितंबर 2008

मित्रा...तुझ्यासाठी



(ही कविता माझ्या एक मित्रासाठी ज्याने सध्या कविता लिहिणे सोडलंय त्याच्या कोमल भावनांचे फुलपाखरू सध्या पंख मिटून बसलंय.... पुन्हा एकदा तो नव्याने आभाळात झेप घेईल हीच आशा मनी बाळगून लिहिलेली ही कविता...)

---------------------------------------------------------------------------------------

भावनांच्या लाटा अदृश्य तरीही
कोसळतात त्यांच्यामुळे कधी
उभार मनाचे मनोरे....
बहरलेल्या एखाद्या बागेचे
गळून जातातही कधी
शब्दफुलांचे फुलोरे...

जरी गळून गेले फुलोरे तरी
अजुन सुगंध आहे बाकी...
भावनांच्या धुक्यातून वाट काढत बाहेर ये,
लक्ख प्रकाश घेऊन तुझी वाट पाहत
मित्रा तुझी जिंदगी आहे अजुन बाकी...

सोमवार, 1 सितंबर 2008

तो...


काल ऑफिसला निघण्याची घाई,
आणि तो आला...
तो असाच येतो अचानक,
आधी सांगून न येताच...


आल्या आल्या म्हणाला,
आज घरी थांब ना सखे...
मी मुद्दामहून वेळ काढून आलोय,
बोलू काही आपल्या मनातले...


माझ्याही मनातले ऐकायला कोण होते
मी ही थांबले....
घरची कामं आवरता आवरता,
अधुनमधून त्याच्याकडे आसूसून पाहत राहिले...


त्याच्या जवळ गेल्या गेल्याच,
त्याने भिजवून टाकलं मला आपल्या वर्षावात...
स्पर्श त्याचे गहिरे अंगभर,
झिरपत राहिले प्राणाप्राणात...


माझं सगळं ऐकून घेत,
दिवसभर तो माझ्या सोबत राहिला,
माझ्या खिडकीच्या आतबाहेर,
मनातल्या वादळांचे आकार घेत
आसमंतात धुवाँधार बरसत राहिला...

संध्याकाळी निघताना म्हणाला,
आता मला गेलंच पाहिजे...
तू ही आता सावर स्वतःला
तुझ्या डोळ्यांतल्या थेंबांवरच
तू इंद्रधनुष्य बांधलं पाहिजे..

जाताना आठवण म्हणून
स्वतःचे दोन थेंब ठेऊन गेला माझ्या डोळ्यात...
आसमंतात भरून रहिलेलं त्याचं अस्तित्व,
मग झिरपत राहिलं पानापानात....

शनिवार, 23 अगस्त 2008

आनंदाच्या लाटांमधूनी



आनंदाच्या लाटांमधूनी
शोधिते तुला मुकुंदा...
हरवुनी मी मला..शोधिते तुला...

शब्दांच्या या पाऊलवाटा
गोकुळातून येती जाती...
शब्दांमधुनी स्पर्श तुझे
स्पर्शांमधली अनाम नाती...
निळाईतून व्यापून राही तूच तू घनश्यामा
हरवुनी मी मला...शोधिते तुला...

बासरीचे सूर दूरवर
आसमंती व्यापलेले
पाऊस वेडा ओला नवथर
प्राणांमधूनी सुर रुजलेले
तनमन व्यापून मुक्त असा तू
मुक्त असा लडीवाळा...
हरवुनी मी मला...शोधिते तुला...


तूच ये....समजून घे

फुलून ये...बहरून ये

लहरत ये...बरसत ये...
तुषार होऊन भिजवून टाक॥
या तृषार्त मना...
हरवुनी मी मला...शोधिते तुला...

शुक्रवार, 22 अगस्त 2008

तुझ्यातील साधेपणा



तुझ्यातील साधेपणा
मनास स्पर्शतो...
कस्तुरीचा गंध कधी
मृगास का कळतो....


रंगरूपा पलीकडे
मनाची दृष्टी....
ज्ञाताच्या पलीकडे
भावनेची सृष्टी...

कर्मावर तुझी आत्मिक निष्ठा
नित्य संयमी देहबोली
खुपसे काही बोलूनही
काही अबोलीच्या कळया
जपलेल्या अजुन मनाच्या तळी...

फुलू दे त्या कळया
व्यक्त होत रहा शब्दांतून
चैतन्याचे झरे मग बघ
वाहतील जणू तव प्राणांतून...

दोन घडींची संगत जरी
जगणे झाले मम जन्माचे...
लाभली ओंजळ मज स्वप्न्फुलांची
सांग फेडू कसे...ऋण या क्षणांचे...

गुरुवार, 21 अगस्त 2008

स्वप्न


एखादं स्वप्न कधी होऊच नये पूर्ण
अपुर्णाची हुरहूर अखेरपर्यंत रहावी
त्या स्वप्नांच मोल कधीच न करता,
आपल्या माणसाची वाट शेवटपर्यंत पहावी...

कसलीच अपेक्षा नसावी
अशा जीवनभर जळणयात...
निराशेची काजळी झटकत,
कुणासाठी तरी आपली
निरांजनाची वात व्हावी...

आपणच व्हावे वाट
वाट त्याची पाहता पाहता
शेवटच्या वळणावर..निरोपाचा हात हलवून
देहातील प्राणाने मग त्याला
अखेरची हाक द्यावी...

डोळे मिटता मिटता मात्र
अखेरचा तोच दिसावा...
अन् ह्या जीवनाची यात्रा मग
त्या एका सुंदर क्षणात संपावी...

बुधवार, 20 अगस्त 2008

डोह


करून मनाच डोह
सामावून घेतलीस किती
ओथंबून आलेली आभाळ
अस्वस्थ मनातली वादळ….

आभाळ होत गेली
मोकळी, नितळ, निरभ्र..
आणि डोह मात्र होत गेला
अधिकाधिक गूढ़, अबोल..तटस्थ..

दुसर्यांसाठी जगयाच्या नादात
तो एवढाही विसरून गेला..
आपल्याही होत्या लाटा
काठापर्यंत यायच्या शोधल्या असत्या तर
अनेक मिळाल्या असत्या वाटा..

आपल्याच मर्यादेत राहून,
तो अधुनमधून उचंबलुन यायचाही..
दोन थेंब नकळत कधी,
आभालाला द्यायचाही...



आभाळ सतत शोधत रहायच,
आपल प्रतिबिंब डोहात..
डोह मात्र व्रतस्थ,
तो कधीही नसायचा कुठल्याही मोहात...

आभालालाही जाणवले होते तेव्हा,
दोघांमधले न संपणारे अंतर...
आभालच भेटायचे डोहाला कधीमधी
होउन मातीच्या गंधाचे अत्तर...

शेवटपर्यंत....
आभाळ राहिले मुके….डोह झाला मुका….
दोघांमध्ये मात्र फिरत राहिला..
..सतत नियतीचा झोका...

सोमवार, 11 अगस्त 2008

तू दिसलास की

तू दिसलास की
माझ्या मनातली फूलपाखरे
भीरभीरत यायची मनाच्या अगदी तळातून..
तू दिसलास की सोनचाफा दरवळून जायचा,
श्वासात माझ्या गंध ओतून...

तू दिसलास की मला चिंब भिजवत,
मनातले आभाळ धुंद बरसायचे...
तू दिसलास की माझे अस्तित्व नकळत,
तुझ्या गंधात विरायचे

असं बरचसे काही व्ह्यायचे,
नुसत्या तुझ्या येण्याने...
तू दिसलास की तनामनावर
तृप्ति पसरून रहायची कणाकणाने....

आता सारे काही बदलले
तू दूर गेलास मनाने,
जाताना घेउन गेलास,
तुझे जादुभरे क्षण,
माझ्या स्वप्नांचे असंख्य कण
आणि ठेउन गेलास मागे
कुणालाही न दिसणारे,
मनाला अखंड जाळणारे
डोळ्यातून नकळत झरणारे
रीतेपनाचे ओले क्षण...

सोमवार, 2 जून 2008

सोनमोहर

सोनमोहर अंगभर फुलताना
त्याची पिवळी फुलं
वा-यावर खाली येताना
तुझ्या सोबत चालताना...

ती फुलं हातात घेऊन
तुला त्यांचं नाव सांगताना...
त्यांना डोळे भरून पहत
त्यांचा गंध मनात साठवून
पुन्हा त्यांना ओंजळीतून
मुक्तपणे उधळून देताना...

मीच मुक्त होत जाते स्वतःतून...
लहरत जाते...

पिवळ्या फुलांच्या
दाट दाट वस्तीतून...

अन् उतरते मग जमिनीवर
अलगद पुन्हा...
वा-याचे पिवळे गाणे होऊन,
सोनमोहराच्या हळुवार झुलणा-या
सांजसावल्या होऊन...
आणि आपल्या बालपणात घेऊन जाणारी
आपल्या आठवणींची
सुंदर पिवळी
फुलपाखरं होऊन....

सोनमोहराची इवली फुलं होऊन...
सोनमोहराची इवली फुलं होऊन...

काळजी

त्या दिवशी,
तुझ्या डोळ्यात उतरलेलं
जड उदासपण
जाणवत राहिलं आरपार
तुझ्या काळजीने सुकलेल्या चेह-यावर होता
मणामणाचा भार.....

भेटलो... उगीच निरर्थक गप्पा मारीत राहिलो
विषयांतर करत
एकमेकांना फसवत राहिलो...

दोघांनाही ठाऊक होतं
इथे खरी मौनाची गरज होती,
तुझ्या कोमेजलेल्या भावनांना
मोकळ्या श्वासाची समज होती...

जाताना... जड पावलं टाकत गेलास
मागे ठेऊन गेलास वेदनेचं विरळ धुकं
दाटून आलेले मेघ तरीही
तुझं आभाळ राहिलं मुकं मुकं

वाटतं... बरसून गेली असती एखादी सर
तर कदाचित तुझं आभाळ निरभ्र झालं असतंही...
कुणी घेऊन तुझा हात हाती
मायेने थोपटलं असतं पाठीवर तर
दिलाशाचं इंद्रधनू अवचित
मनावर उमटून गेलं असतंही...

बुधवार, 7 मई 2008

जमाखर्च


भविष्याच्या शोधात धावताना
तुझा वर्तमान तर जगायचा राहून जात नाही ना ?
सृष्टीत चैतन्य जागवत वसंत आलाय
दूर बघ कोकीळ गातोय
हे सगळं अनुभवायचं
राहून तर जात नाही ना ?

तुझी लेक ही करीत असेल हट्ट
भातुकली खेळ माझ्याशी म्हणून,
तिनेच केलला खोटा खोटा स्वयंपाक
तिच्याच खेळण्यांतून खाताना
तिचे आनंदाने चमकणारे डोळे पाहणे
कधी राहून तर जात नाही ना ?

तुझ्याही अंगणातील रोपांवर
फुलत असतील फुले
त्यांना पाणी घालता घालता
त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवताच
त्यांना तृप्त होऊन डोलताना पाहणे
कधी राहून तर जात नाही ना ?

मनात चांदणं घेऊन
कुणी तुझ्या जवळचं
पाहत असेल तुझी वाट एकांतात,
त्याच प्रतिक्षेत त्या कोमल क्षणांचं
हळूवारपणे फुलणे
कधी राहून तर जात नाही ना !

अशा किती गोष्टी
राहून जातात करायच्या यादीत...
मग परतायची वेळ होते
अन् आपण करू लागतो जमाखर्च आयुष्याचा....


जमेच्या बाजूत जमा असतात आपल्याकडे
आपल्या यशाचे काही चमकदार तुकडे
आणि खर्चाच्या बाजूत असते
आयुष्यभर दिसूनही
अनुभवता आलेले
अबोल स्वरांचे चांदणे....

रविवार, 20 अप्रैल 2008

बहर


आज माझ्या बहराची वेळ आहे,
आजच मला जगून घेऊ दे,
पुढे कदाचित....
एका एका श्वासासाठी
तडफडावे लागेल....
एका एका शब्दासाठी
निमीत्त शोधावे लागेल ! !

प्रेरणा


माझ्या या सगळ्या कविता माझ्या एका सह्रदय मित्रास अर्पण...
ज्याने माझ्या स्वप्नांना पंख दिले... दिशा दिली... आणि
जो स्वतः माझ्यासाठी आभाळ झाला....

मी उमलून, दरवळणारा सुगंध तू...
माझ्या रंध्रातून वाहणारा शब्द तू...
देऊन स्वप्नांना पंख माझ्या
आनंदाने पाहणारा तू,...
एक सत्य तू.... एक स्वप्न तू...
एक कधिही न संपणारे काव्य तू...
माझी प्रेरणा तू....
माझं आभाळ तू...
माझं आभाळ तू....

अव्यक्त


राहू दे काही अव्यक्त
तुझ्यात-माझ्यात,
बकुळगंध जसा मनाच्या गाभ्यात...
तुझ्या अंतरीचा जिव्हाळा जेव्हा
तुझ्या सुंदर डोळ्यांत दिसतो,
तेव्हा दूर कुठेतरी कृष्ण सखा
राधेसाठी बासरी वाजवीत असतो...

पद्मजा


तुमच्या पापणीतून ओघळलेला
अनावर अश्रू
तुमच्या सुंदर मनाचं प्रतिक होता,
आवरून ठेवलेल्या भावनांसाठी आज
पापणीचा काठ मात्र मोकळा होता...

मुक्तांगण


सहजासहजी मोडता येत नाहीत आपल्याला
आपणच उभारलेल्या
आपल्या भोवतीच्या अदृश्य चौकटी...

चौकटी कधी साध्यासुध्या, कांतीहिन, करकरणाऱ्या चौकटी कधी
गर्भश्रीमंत, सुवर्णजडित, लखलखणाऱ्या...

चौकटींचा मान मोठा...
चौकटींना भाव मोठा...
चौकटींपुढे आतली चित्रं... पालापाचोळा

पाचोळ्याने मग विचारायचं नसतं...
चौकटीतच भिरभिरायचं असतं...
मळलेल्या वाटांवर पावलं टाकत
आंधळेपणानं चालायचं असतं...

चौकटीतली चित्रं छान, सुबक, देखणी
तरीही कधी कधी निर्जीव भासतात
देऊन स्वत्वाचं दान
गुलामीच्या साखळ्या त्यांच्या पायात असतात...

मग... चित्रांनाच कधीतरी भान येतं...
चौकट ओळखण्याचं...
चित्रांनाच कधी बळ मिळतं
चौकट मोडण्याचं...

कोंडू पाहणाऱ्या चौकटीते बांध फोडून
अशीच जीवनसरिता वाहू दे ...
मुक्त श्वास लाभो लाखमोलाचा
अवघं जीवन
मुक्तांगण होऊ दे...
मुक्तांगण होऊ दे..
.

प्रिय सखी अरूणा


तू येतेस अन् मनभर माझ्या
सुगंध दरवळतो...
तुझ्या अवतीभवती
कुठला ऋतू बहरतो...

तू समोर असताना काही क्षण का होईना
मी माझ्या कोषातून बाहेर येते...
मुखवटा जरासा बाजूला सारून
एखादा मोकळा श्वास घेते...

तू बोलत राहतेस तुझ्या डोळ्यांतून
आणि न दिसणाऱ्या पापण्यांआडच्या
पाण्यातूनही ....

मी तनामनाने ऐकत जाते... अन्
कुठलेही बंधने नसलेले आपले अलवार नाते
पाकळी पाकळीने फुलत जाते....

ऊन वारा सोसत,
आनंदाचं झाड बनलीयस तू
हे तूला ठाऊकही नसावं...
प्रत्येकाच्या अंगणात फुलं टाकीत जाणं
यातच तुझं आत्मिक समाधान असावं....

काही क्षण का होईना
दुसऱ्याच्यां भावना वेचून आपल्या पदरात घेतेस...

देऊन सर्वांना आनंदाचे दान
सखे
तू आभळाएवढी होतेस...
तू आभळाएवढी होतेस...

मनाच्या ओल्या मातीवर

मनाच्या ओल्या मातीवर
उमटू लागली आहेत
नकळत तुझी पाऊले...
अन् त्या पाऊलखुणा
पुसून टांकण्याचा
माझाही निकराचा प्रयत्न चाललाय
निरर्थकपणे........


प्रत्येकाला मिळावेत
प्रकाशाचे दोन थेंब
आणि प्रत्येकाच्या जीवनाचा
एखादा तरी कोपरा
उजळत जावा....


प्रत्येकाला मिळावी कधी
रंगांची सोबत....
आणि प्रत्येकाच्या जीवनाचा
एखादा तरी धागा प्तरंगी व्हावा.......

प्तरंगी व्हावा....

मंगलवार, 15 जनवरी 2008

मैत्री


तो असा कधीमधीच भेटतो,
कधीही, कुठेही, अचानक,
पण जेव्हा भेटतो,
तेव्हा आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटतं,
निखळ मैत्रीचं, खुप दिवसांनी भेटल्याचं...

आमची मैत्री कशी झाली
निटसं काही आठवत नाही,
गाणं, विनोद, गप्पा मारण्याचं वेड,
बहुधा हेच समान धागे असावेत.

तसा तो माझ्यापेक्षा वयाने लहान
पण मैत्रीसाठी वयाची मर्यादा असते का ?
त्या दिवशी पेटीच्या क्लासवरुन येताना
त्याने ती आनंदाची बातमी सांगीतली,
त्याचं लग्न ठरल्याची,
त्याचा आनंदी चेहरा पाहून,
जाणवत राहिलं, त्याच्या जीवनात
बहराचा काळ लवकरच येणार आहे,
त्याचं लग्न झालं, सोनपावलांनी ती त्याच्या आयुष्यात आली,
यधावकाश त्यांच्या संसारवेलीवर
एक सुंदर फूल उमललं,
जीवनाच्या फांदीवर आनंद बहरला.

मधल्या काळात भेट अशी झालीच नाही,
माझंही ऑफिस, घरची-बाहेरची कामं,
लेकीचा अभ्यास, न संपणारी कामं - जबाबदाऱ्या

त्या दिवशी तो असाच अचानक दिसला,
कॉलनीच्या अलीकडे असलेल्या कठडयावर टेकलेला....

पटकन ओळखलंच नाही, इतका तब्येतीत
पॉझीटीव्ह फरक झालेला,
शांतपणे बसलेला
आपल्याच विचारात हरवलेला.

मी हाक मारली, तसं चमकून पाहिलं
आणि हसला,
मी म्हटलं इथं कुठं बसलास ?
म्हणाला गाडीला खूप गर्दी होती,
जरा वारा खात बसलो होतो,
ते तसं तिथे बसण्याचं तेच एक कारण होतं की आणखी काही !

घर येईपर्यंत चालता चालता

पुन्हा सुरु झाल्या, अशाच अवांतर गप्पा,
त्याच्या-माझ्या मुलांची विचारपूस, कौतुकं,
एखादा विनोद आणि त्यानंतरचं निखळ हसूं.

दमलेलं मन पुन्हा एकदा रीचार्ज झालं होतं,
अशाच अचानक होणाऱ्या, पुढच्या भेटीपर्यंत..

गुलमोहर


स्वयंपाकघराच्या खिडकीमधून
तुझं बदलणारं रुप पाहत होते,
तुझ्या फांद्यांवर बसून कोकिळा गाणं म्हणू लागली,
अन् तुझे निष्पर्ण देह
कोवळ्या पालवीने फुलू लागले.

एखाद्या बैराग्यासारखं दिसणारं
तुझं उघडं अंग
हिरव्या वस्त्रानं हळूहळू झाकू लागलं..
पण पाहत होते,
अजूनही तुझा आनंद पोटातच होता.
त्या दिवशी अचानक उमललेली दोन-चार फुलं पाहिली
अन् पाहिलं तर तोच केशरी आनंद
आता तुझ्या डोळ्यांत होता....

ये परत असा


कुणी सांगावं, तुला परत फिरावसं वाटेल,
धावता धावता अचानक थांबावसं वाटेल,
ये परत असा....

अजूनही मी उभी आहे,
तेच आश्वासक बाहू पसरून
त्याच जुन्या वळणावर...
जिथून तू दूरावत गेलास,
कणाकणानं.....

आणि मी देखील तूला थांबवलं नाही,
कारण मला ठाऊक होतं....
वाऱ्याला आवरणं कोणाच्याही हातात नसतं...

आणि तरिही
वाऱ्याशी जिन्दगीचं नातं
एक अटळ सत्य असतं...
एक अटळ सत्य असतं....

सूर तुझे

तुझ्या सुरांनी पुन्हा वठलेलं झाड बहरलं,
जगण्याच्या इच्छेतून पालवी फुटू लागली,
जणू चंद्रचांदणे उतरून माझ्या अंगणात आले,
अन् माझेही सूर तुझ्यासवे, नकळत गुणगुणले
हे असेही घडेल असं कधी वाटलं नव्हतं....

अंधाऱ्या वाटेवरची मी एक प्रवासी
अशीच चालणार होते,
ह्रदयातील एक जखम घेउन,
अश्वत्थाम्यासारखी माझं अस्तित्व संपेपर्यंत,





पण आता वाटतंय,
भाळावर जेथे जखम आहे,
तिथेच आसपास आहे तुझ्या स्वरांची लिपी,
त्यानेच आखलेल्या ह्या दोन रेषा,
एक रेषा त्याची,
एक रेषा तुझी.

रविवार, 13 जनवरी 2008

चित्र

ऑफिसपासून जवळच असलेल्या 'जहाँगीर आर्ट गॅलरीत' प्रसिद्ध चित्रकार गोपाल स्वामी खेतांची (Gopal Swami Khetanchi) यांच्या चित्रांचं प्रदर्शन होतं. प्रदर्शन स्त्रियांचे सोळा "श्रृंगार" या विषयावर आधारित होते. अक्षरशः डोळ्यांची पारणे फेडणारी ती चित्रे पाहताना देहभान हरपत होतं. चित्रातील स्त्री चं सौंदर्य, त्यांची राजेशाही आभूषणं, रेशमी वस्त्रांचा तलमपणा... सगळंच अद्‍भूत आणि काव्यमय... जाणवत राहिल्या केवळ रंगांतून उमलणाऱ्या, मनाला स्पर्शणाऱ्या... आनंदाच्या लाटाच लाटा....

(सर्व चित्रांचे सर्वाधिकार श्री
गोपाल स्वामी खेतांची (Gopal Swami Khetanchi) यांचे आहेत. कवितेचं उत्तम तऱ्हेने रसग्रहण करता यावं यासाठी फक्त त्यांची चित्र दर्शवली आहेत.)


तुझी मोहक काया
जणू रंगांची किमया
कधी असे सख्यांचा संग
कधी भासे स्वतःमध्ये दंग
नेत्रात दाटलेली लज्जेची चाहूल
वेडावीते मज तुझे मेंदीचे पाऊल
संदेश वाचता उमटे
हलकेच मुखावरी स्मित
सखे तू... चांदणफूल
सखे तू.. चांदणफूल...


गर्भरेशमी वस्त्रे तुझी
तुजवर मोत्यांची उधळण...
डौल तुझा मोराचा
तूच मोरपीस... सखे तूच मोरपीस..

नयन तुझे आरस्पानी
कमलदलाची.. जणू कहाणी
वाऱ्यात मिसळूनी वाहे
तुझ्या रूपाची कस्तूरी
तू प्रसन्ना.. तू नाजूका..
जणू वेलींवर फुलली जाई...




सौंदर्याची परिभाषा तू
तू एक पहाटस्वप्न..
सखे... तू एक पहाटस्वप्न...

तू आहे प्रत्यक्ष की आहेस भासमान
भास आभासाच्या क्षितीजावर
तू एक चंद्रकोर
तू सूवर्णा.. तू केतकी..
मनात दाटलेले इंद्रधनूते रंग किती
विस्मरण होईना तुझे कसे
तू गूढ..... तू अनिवार ओढ
सखे तू अविस्मरणीय चित्र
सखे तू अविस्मरणीय चित्र.....

पालवी


प्रत्येकाच्या आयुष्यात Bad Patch अर्थात 'वाईट काळ' हा येतच असतो, तेव्हाही खचून न जाता चांगला काळ नक्की येईल असा सकारात्मक विचार घेऊन जगणाऱ्यांसाठी....

"पालवी"

आज पुन्हा शब्दांना पालवी फुटतेय
कुठला ऋतू हा ?

युगानुयुगे वठलेल्या ह्या देहाच्या वृक्षात
आतून पुन्हा
सळसळ जाणवतेय,
पुन्हा उन्हाचे कवडसे स्पर्शू लागलेत
अंधाऱ्या मनाच्या खोल गाभाऱ्याला,

अनंत काळापूर्वी निपचीत पडलेली

अबोल मनाची पाखरे,

पुन्हा प्रकाशाकडे झेपावू पाहतायत

ही काय जादू !


हा खरंच ऋतूबदल म्हणवा की
हे सारे मनाचेच खेळ...

वाटतं...

बहुधा संपत आली असावी माझी
शापीत निराशेची वेळ....

अंतिम सत्य

मृत्यू हेच जीवनाचं "अंतिम सत्य"....
मृत्यूलाच प्रियकर मानून त्याच्या भेटीसाठी आतुर झालेल्या मनाची ही कविता...



जेव्हा येशील कधी अचानक,
आसमंत हा स्तब्ध असेल,
पण...

ह्या डोळ्यांत असेल
प्रतिक्षा.... फक्त तुझीच...

माझ्याही नकळत
तुझ्या दुनियेत जाताना,
सगळ्या संवेदना धुक्यात विरत जाव्यात...
निरर्थक जीवनाचा केंद्रबिंदू होऊन
माझं अस्तित्व शुन्य करताना...
अनेक ह्लदयांची हळूवारे स्पंदने
तूला थांबवू पाहतील...
माझ्या नेत्रांतील तुझे प्रतिबिंब
अनेकांच्या मनात अश्रुकण शिंपत जाईल...
पण त्या वेडया मनांना
कशी दिसणार..
तुझ्याकडे ओढणारी माझी अगतिक पाऊले...
माझ्यासाठीच तू वाटेवर जपलेला
नक्षत्रांचा सडा....
अन..
अखरेच्या मैफलीत
बासरीच्या सुरात
हळूहळू विरघळणारं
माझं अस्तित्व
निशब्दपणे !

सोमवार, 7 जनवरी 2008

प्राजक्ता

तू यायच्या आधीच तुझं नाव ठरलेलं होतं....
पहाटेच्या दंवात प्राजक्त फुलावा
असं तुझं बाळरूप पाहिलं,
आणि आपला निर्णय किती अचूक होता
असं आयुष्यभर वाटत राहिलं....