सोमवार, 2 जून 2008

सोनमोहर

सोनमोहर अंगभर फुलताना
त्याची पिवळी फुलं
वा-यावर खाली येताना
तुझ्या सोबत चालताना...

ती फुलं हातात घेऊन
तुला त्यांचं नाव सांगताना...
त्यांना डोळे भरून पहत
त्यांचा गंध मनात साठवून
पुन्हा त्यांना ओंजळीतून
मुक्तपणे उधळून देताना...

मीच मुक्त होत जाते स्वतःतून...
लहरत जाते...

पिवळ्या फुलांच्या
दाट दाट वस्तीतून...

अन् उतरते मग जमिनीवर
अलगद पुन्हा...
वा-याचे पिवळे गाणे होऊन,
सोनमोहराच्या हळुवार झुलणा-या
सांजसावल्या होऊन...
आणि आपल्या बालपणात घेऊन जाणारी
आपल्या आठवणींची
सुंदर पिवळी
फुलपाखरं होऊन....

सोनमोहराची इवली फुलं होऊन...
सोनमोहराची इवली फुलं होऊन...

काळजी

त्या दिवशी,
तुझ्या डोळ्यात उतरलेलं
जड उदासपण
जाणवत राहिलं आरपार
तुझ्या काळजीने सुकलेल्या चेह-यावर होता
मणामणाचा भार.....

भेटलो... उगीच निरर्थक गप्पा मारीत राहिलो
विषयांतर करत
एकमेकांना फसवत राहिलो...

दोघांनाही ठाऊक होतं
इथे खरी मौनाची गरज होती,
तुझ्या कोमेजलेल्या भावनांना
मोकळ्या श्वासाची समज होती...

जाताना... जड पावलं टाकत गेलास
मागे ठेऊन गेलास वेदनेचं विरळ धुकं
दाटून आलेले मेघ तरीही
तुझं आभाळ राहिलं मुकं मुकं

वाटतं... बरसून गेली असती एखादी सर
तर कदाचित तुझं आभाळ निरभ्र झालं असतंही...
कुणी घेऊन तुझा हात हाती
मायेने थोपटलं असतं पाठीवर तर
दिलाशाचं इंद्रधनू अवचित
मनावर उमटून गेलं असतंही...