गुरुवार, 26 फ़रवरी 2009

मुखवटा



वारा आज अगदीच पडलाय..
कुठे झाडाचं पानही हलेना
श्वास घ्यायलाही त्रास व्ह्यावा
असं काहीसं जड़ वातावरण...

ती असं मनात म्हणता म्हणताच
सुरु होतो वा-याच्या रेशमी झुळकांचा हळुवार खेळ…
झाडांच्या पानापानात शिरून
तिच्या मनाच्या गाभ्यात शिरेपर्यंतचा...

वारा खेळत असतो लड़ीवाळपणे
तिच्या रेशमी केसांच्या लाटांतून..
ती स्वतः होते एक शुभ्र हलके पिस
अलगद तरंगत जाणारे आभाळापर्यंत..

आभाळाच्या निळ्याजांभळ्या रंगावर
तिला दिसतो एकाच चांदणीचा चंदेरी ठिपका..
आणि..बागेत बसलेली एकटीच ती
तिला भासते ती… त्या चांदणीसारखीच एकटी...

मुलांचे खेळ..पाखरांचे घरी परतणे..
काहीसा निवांतपणा..
आणि जोडीला असेच कितीसे सुंदर भास…
त्या सुखद झुळकांनी तिच्या तनामनाला
एक गोडसं जड़पण आलेलं...

तिला वाटतं उठुच नये इथून
बसावं असचं अविचल..कितीही वेळ..

पण ती मनाला मुरड घालत उठतेच..
मनात म्हणते..
चला घरच्यांची घरी यायची वेळ झाली..
दार उघडायला त्यांना हवं असतं कुणीतरी..

तिच्या सगळ्या भावना आता कर्तव्य होतात..

बागेतल्या बाकावरुन उठता उठता
शेजारीच ठेवलेला मुखवटा मात्र ती आठवणीने घेते
आणि..
सवयीने तिची पावलं.. घराच्या दिशेने पडू लागतात..

फुलदाणी



डायनिंग टेबलावर सुंदर फुलदाणी
फ़ुलदाणीत ठेवलेले
पांढ-याशुभ्र इवल्या फुलांचे डौलदार तुरे
घराची शोभा वाढवून
आजुबाजुला जणू सुगंध सांडणारे...

घरी येणारे जाणारे विचारतात
खरी फुलं
हो..
सुंदर आहेत हं..
Thanks..

डायनिंग टेबल पुसता पुसता
न राहवून फुलांना हात लावतेच
ती वाळून कडकडीत झालेली फुलं
नुसत्या स्पर्शानेच त्यातली काही गळून पडतात...

म्हणतात सुकलेली फुलं घरात ठेवू नयेत म्हणुन
टाकुन द्यावीत..
पण प्रत्येक सुकलेली गोष्ट
अशी सहजासहजी टाकता येत नाही...नाही का ?
अगदी... आपलं आयुष्यही..

कोणाच्या लक्षात येण्याआधीच
ती फुलं मी लगबगीने उचलून घेते..
पुन्हा एकवार ती फुलं नीटनेटकी होतात
घराची शोभा वाढत रहावी म्हणुन..

सोमवार, 23 फ़रवरी 2009

शेवटचं पत्र

सगळ्या ऋतुंच्या पायघडया ओलांडून
मी निघून गेले ऐन वसंतात
तुझा हात सोडून..अर्ध्या वाटेवरून...
तुला कारण ठाउक होतं..
तरीही रागावला असशील ना ?

तुझा रागही फसवा..तुझ्यासारखाच..
आता संपलं आपल्यातलं सगळ
असं कितीदा म्हणुन
अबोल्यानंतरच्या पहिल्याच भेटीत
हसरी शब्दफुलं उधळणारा..
सहजच बोलतोय असं दाखवणारा...

आपल्या बहरकळ्या आपणच खुड्ताना
आपण स्वतःचा प्राणच खुडतो
हे कळत का नाही मला ?

मी समोर आल्यावर प्रत्येकवेळी
उध्वस्त होणारं तुझं स्वप्नांच घर
दिसतं रे मलाही..

त्या घराचे सुंदर अवशेष
जिवापाड जपलेत पदरात माझ्या
अजुनही...

डोळ्यात येणारे अश्रु कुणाला दिसू नयेत म्हणुन
माहितीये काय करते मी..
खूप खूप हसते..आनंदी राहते..

ते जावू दे..
अजुनही तशीच पाहतोस का रे..स्वप्ने भविष्याची
तुझ्या स्वप्नील डोळ्यांनी..
आणि..आणि तो सोनामोहराच्या फुलांचा सडा
अजुनही तसाच सांडतो का रे आपल्या पायवाटेवर..
त्या फुलांना हातात घेउन चालायची माझी सवय..
पण आता नाही घेत हातात त्यांना
उगीच तू आठवायचा..
अजुनही..

आता कोणाशी बोलतोस मनाच्या अगदी आतलं
की बोलतच नाहीस..कोणास ठावूक..

अरे हो एक सांगायचं राहूनच गेलं
तुझी एक महत्वाची वस्तु
माझ्याकडेच राहून गेलीये..
खूप शोधाशोध केली असशील तुही..
पण नसेल सापडली तुला..
वेळ मिळाला की घेउन जा..

मोडलेलं असलं तरी 'मनच' ते
घेउन जा आठवणीने..
तुझ्याही नकळत चुकून माझ्याकडेच राहून गेलय ते...

रविवार, 22 फ़रवरी 2009

चिमण्यांचे झाड...


रोज सकाळी चिमण्यांच्या आवाजाने
बागेतली अशोकाची झाडे बोलू लागतात...
त्यांच्या नव्या दिवसांच्या चाहुली
पानोपानी जाणवू लागतात...

काहीसा उजेड काहीसा अंधार
पूर्वरेषेवर रेंगाळत असतो...
चिमण्यांच्या टिपेला पोहचलेल्या आवाजाने
अशोकवृक्षही जणू शहारत असतो...

हळुहळु काळोखाला छेद देत
कुठुनसा उजेड येऊ लागतो...
प्रकाशाचं स्वप्न पंखांवर घेण्यास
उत्सुक चिमण्यांचा थवा सज्ज होऊ लागतो...

आता पुरेसं उजाडलेलं असतं
आवाजही हळुहळु कमी होत जातात...
खुपश्या चिमुकल्या भुर्र भरा-या
घरांवर, छपरांवर विसावू लागतात..

हळुहळु अशोकाचे झाड अबोल होते
उडून गेलेल्या चिमण्यांची वाट पाहताना...
संध्याकाळी मात्र पुन्हा गजबजणार असतो त्याचा गाव
चिमण्यांच्या नव्या कहाण्या ऐकताना...

बुधवार, 18 फ़रवरी 2009



आज ब-याच दिवसांनी काही ओळी सुचल्या..


खरंच कविता खरी असते की असतो आभास सारा
दुख-या मनावर शब्दांचा उतारा...

कधी चांदणे ती...कधी रणरणते ऊन
कधी मनात वाजते…होउन आर्त धून...

होई कधी ती...एक पाखरू पाखरू
कधी उदास मनाला कशी सावरू सावरू...

कधी तिच्यासाठी माझ्या..ओल्या मनवाटा
कधी रुसल्या शब्दांचा..उरी सले काटा...

माझा श्वासही अखेर..तुझ्या संगतीने जावा
आज अज्ञात प्रदेशी...तुला धाडते सांगावा...

रविवार, 7 सितंबर 2008

मित्रा...तुझ्यासाठी



(ही कविता माझ्या एक मित्रासाठी ज्याने सध्या कविता लिहिणे सोडलंय त्याच्या कोमल भावनांचे फुलपाखरू सध्या पंख मिटून बसलंय.... पुन्हा एकदा तो नव्याने आभाळात झेप घेईल हीच आशा मनी बाळगून लिहिलेली ही कविता...)

---------------------------------------------------------------------------------------

भावनांच्या लाटा अदृश्य तरीही
कोसळतात त्यांच्यामुळे कधी
उभार मनाचे मनोरे....
बहरलेल्या एखाद्या बागेचे
गळून जातातही कधी
शब्दफुलांचे फुलोरे...

जरी गळून गेले फुलोरे तरी
अजुन सुगंध आहे बाकी...
भावनांच्या धुक्यातून वाट काढत बाहेर ये,
लक्ख प्रकाश घेऊन तुझी वाट पाहत
मित्रा तुझी जिंदगी आहे अजुन बाकी...

सोमवार, 1 सितंबर 2008

तो...


काल ऑफिसला निघण्याची घाई,
आणि तो आला...
तो असाच येतो अचानक,
आधी सांगून न येताच...


आल्या आल्या म्हणाला,
आज घरी थांब ना सखे...
मी मुद्दामहून वेळ काढून आलोय,
बोलू काही आपल्या मनातले...


माझ्याही मनातले ऐकायला कोण होते
मी ही थांबले....
घरची कामं आवरता आवरता,
अधुनमधून त्याच्याकडे आसूसून पाहत राहिले...


त्याच्या जवळ गेल्या गेल्याच,
त्याने भिजवून टाकलं मला आपल्या वर्षावात...
स्पर्श त्याचे गहिरे अंगभर,
झिरपत राहिले प्राणाप्राणात...


माझं सगळं ऐकून घेत,
दिवसभर तो माझ्या सोबत राहिला,
माझ्या खिडकीच्या आतबाहेर,
मनातल्या वादळांचे आकार घेत
आसमंतात धुवाँधार बरसत राहिला...

संध्याकाळी निघताना म्हणाला,
आता मला गेलंच पाहिजे...
तू ही आता सावर स्वतःला
तुझ्या डोळ्यांतल्या थेंबांवरच
तू इंद्रधनुष्य बांधलं पाहिजे..

जाताना आठवण म्हणून
स्वतःचे दोन थेंब ठेऊन गेला माझ्या डोळ्यात...
आसमंतात भरून रहिलेलं त्याचं अस्तित्व,
मग झिरपत राहिलं पानापानात....